बोम्मईच्या ट्विटबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा, चर्चेत नेमकं काय घडलं, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं
नवी दिल्ली : सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी, देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यांचे गृहमंत्री या बैठकीला उपस्थित होते. दोन राज्यांमध्ये काही घटना होत होत्या. महाराष्ट्राच्या जनतेला त्रास होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका होती. चर्चेत दोन्ही राज्यात शांततेचं आणि सौहाद्राच्या सूचना दोन्ही राज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या.
दोन्ही राज्यातील तीन-तीन मंत्र्यांची समिती गठित होईल. मराठी भाषा, मराठी माणसं, मराठी लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, अशी भूमिका मांडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे. याचा कुठंही अवमान होऊ नये, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही ही बाब मान्य केली. ट्वीटबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. हे ट्वीटर हँडल माझं नसल्याचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याचा अर्थ कुणीतरी आगीत तेल ओतण्याचं काम करतंय, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी लावला.
मराठी भाषिकांच्या भावनांशी खेळण्याचा कुणी प्रयत्न करू नये. यामध्ये सगळ्यांनी मिळून मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहीलं पाहिजे. सरकार त्यांना मदत करणारचं आहे. बैठक सकारात्मक झाली आहे. दोन्ही राज्यातील संबंध सुधारण्यास मदत होणार असल्याचंही ते म्हणाले.
यामुळं कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील वाद मिटावा, यासाठी खुद्द अमित शहा यांनी पुढाकार घेतला. आता दोन्ही राज्यात चांगलं वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षाही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.