बेळगावातील प्राजक्ता बेडेकर या गेल्या वीस वर्षांपासून हलव्याचे दागिने करत असून त्यांच्या हलव्याच्या दागिन्यांना केवळ भारतातून नाही तर परदेशातून देखील मागणी आहे.संक्रांतीला हलव्याचे दागिने लहान मुलांना घालण्याची परंपरा असून महिला,पुरुष देखील हौस म्हणून हलव्याचे दागिने घालतात.
नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला देखील हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा आहे.प्राजक्ता बेडेकर या बेळगावच्या असून प्रारंभी त्यांनी आपल्या मुलीसाठी संक्रांतीला हलव्याचे दागिने केले.त्यांनी केलेले दागिने पाहून त्यांच्या परिचयाच्या लोकांनी पुढच्या वर्षी दागिन्यांची ऑर्डर दिली.नंतर परगावातील लोकांनी देखील दागिन्यांची ऑर्डर देण्यास सुरुवात केली.आज देशातील अनेक भागात तर त्यांच्या हलव्याच्या दागिन्यांना मागणी आहेच.शिवाय परदेशातून देखील त्यांना ऑर्डर मिळत आहेत.
अमेरिका,इंग्लंड,सिंगापूर,दुबई,जर्मनी,जपान येथून त्यांच्या दागिन्यांना मागणी आहे.यावर्षी तर श्रीलंकेतून देखील ऑर्डर आली आहे.लहान मुलांचे,लहान मुलींचे,महिलांचे आणि पुरुषांचे असे चार प्रकारचे हलव्याचे दागिने प्राजक्ता तयार करतात.दरवर्षी त्या आपल्या दागिन्यात नावीन्य जपण्याचा प्रयत्न करतात.यावर्षी शंभरहून अधिक दागिन्यांच्या सेटची ऑर्डर प्राजक्ता यांनी पूर्ण केली आहे.केवळ हलव्याच्या नव्हे तर सोन्याचा वापर करून देखील त्यांनी हलव्याचे दागिने तयार करण्याचे कौशल्य प्राजक्ता यांनी आत्मसात केले आहे.