उचगाव फुटबॉल क्लब आयोजित मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर ‘मिनिस्टर ट्रॉफी’ फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद ओल्ड फाटा संघाने हस्तगत केले. भैरवनाथ फास्ट फॉरवर्ड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
उचगाव येथील वैकुंठधाम मैदानावर सदर स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य जावेद जमादार, गायत्री ज्वेलर्सचे मालक राकेश बांदिवडेकर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जाधव, ग्रा. पं. सदस्या भारती जाधव, माधवराव राणे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ओल्ड फाटा संघाला 35,000 रुपये व ट्रॉफी आणि उपविजेत्या भैरवनाथ फास्ट फॉरवर्ड संघाला 15,000 रुपये व ट्रॉफी बक्षीस दाखल देण्यात आली. उत्कृष्ट संघ म्हणून युएफसी संघाची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट बचावपटू व उत्कृष्ट गोलरक्षक या वैयक्तिक पारितोषिकांचे वितरणही करण्यात आले.
स्पर्धेचा विजेतेपदाचा करंडक हॉटेल रेड स्टोन आणि उपविजेतेपदाचा करंडक गायत्री ज्वेलर्स यांनी पुरस्कृत केला होता. तसेच वैयक्तिक पारितोषिके जावेद जमादार, विजेता स्पोर्ट्स व गजानन बांदिवडेकर यांनी पुरस्कृत केली होती. यावेळी बाळकृष्ण तेरसे व मथुरा तेरसे यांच्याकडून खेळाडूंना जर्सी भेटी दाखल देण्यात आल्या. तसेच शशिकांत जाधव आणि भारती जाधव यांनी फुटबॉल स्पर्धेसाठी लागणाऱ्या साहित्याचे किट देणगी दाखल दिले. सदर स्पर्धेच्या निमित्याने नागशांती ग्रुप यांच्याकडून सायकलसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आली होता. या लकी ड्रॉचा मानकरी गोजगे येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलमधील इयत्ता आठवीचा विद्यार्थी सुमित कल्लेहोळकर हा ठरला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जावेद जमादार, अखिल पावशे, मयांक पावशे, विकास पाटील, दारसाब पाटील, अथर्व जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.