सीमाप्रश्नाच्या संदर्भात आणि सीमाभागातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.
सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून लवकरच मंत्री चंद्रकांतदादा पाटील ,दीपक केसरकर यांच्या समवेत दिल्लीला जावून वकिलांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत सांगितले.महाराष्ट्र सरकार दाव्याबाबत जे काही करता येईल ते सगळे करेल. शिनोळी येथे सिमावासियांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी कार्यालय सुरू करणार असून तेथे उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच वैद्यकीय मदतीसाठी तेथे सीमाभागातील ८६५ गावातील मराठी भाषिकांचे अर्ज स्वीकारण्यात येतील.अर्ज केलेल्या व्यक्तींना त्वरित मदत देण्यात येईल असे आश्वासन देखील सीमाप्रश्न प्रश्नाचे समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.बैठकीला माजी आमदार मनोहर किणेकर ,प्रकाश मरगाळे,दिनेश ओउळकर,रमाकांत कोंडूसकर अन्य पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.