बेळगाव : रोजगार हमी योजनेतील कामगार फेस रिडिंग हजेरी देता यावी, यासाठीची व्यवस्था प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये केली जात आहे. त्यामुळे आता बायोमेट्रिक हजेरीऐवजी फेस रिडिंग हजेरी सक्तीची होणार आहे. जानेवारी महिन्यापासून बायोमेट्रिकऐवजी फेस रिडिंग हजेरीची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार होती.
पण सर्व ग्रामपंचायतींना ही उपकरणे उपलब्ध न झाल्याने हजेरीचे काम जुन्याच पद्धतीने सुरू होते. आता उपकरणे उपलब्ध झाली असेल, तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिली जात आहेत. यामुळे रोहयोच्या कामात पारदर्शकता येणार असून, पात्र लाभार्थ्यांना कामाची संधी मिळणार आहे.
केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेतील कामगारांना एप्रिल २०२२ पासून बायोमेट्रिकची सक्ती केली होती. त्याची जागा आता फेस रिडिंग घेणार आहे. रोहयोत यंत्राच्या साहाय्याने होणारी कामे थांबविण्यासाठी तसेच पात्र कामगारांना रोहयो काम मिळावे, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.
त्यानुसार कामावर हजर होणाऱ्या कामगारांना दिवसातून तीनवेळा फेस रिडिंग हजेरी द्यावी लागेल. सकाळी कामावर हजर होताना, दुपारी एक वाजता आणि सायंकाळी पाच वाजता ही हजेरी द्यावी लागणार आहे. या हजेरीमुळे यंत्राचा वापर कमी होणार आहे.