बेळगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जादू टोणा करण्यासाठी वापरली जाणारी काळी बाहुली अज्ञाताने झाडावर लटकावल्याने त्या बाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.अनेकदा जादू टोणा करणारे यांच्याशी शत्रुत्व असते किंवा एखाद्याकडून काही काम करवून घ्यायचे असते त्यांच्या घरासमोर काळी बाहुली,लिंबू ,बिब्बे ,कोंबडी आदी ठेवलेले पाहायला मिळतात.पण बेळगावात चक्क सरकारी कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या झाडाला भयावह दिसणारी काळी बाहुली लटकवल्याने त्या विषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
काळ्या बाहुलीला डोळे काढण्यात आले असून जबड्याच्या ठिकाणी दातांचा सेट बांधण्यात आला आहे.त्यामुळे झाडावर लटकत असलेली बाहुली पाहून पाहणाऱ्याला भीती वाटते.तहसीलदार कार्यालयात ज्याचे काम अडले आहे अशा व्यक्तीने किंवा अन्य कोणी तरी वेगळ्या उद्देशाने ही काळी बाहुली बांधली असावी अशी चर्चा रंगली आहे.शनिवार दुसरा शनिवार असल्याने कार्यालयाला सुट्टी होती.त्यामुळे सोमवारी कार्यालय सुरू झाल्यावर त्या बाहुलीचे काय केले जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.