दुकाने उघडण्या अगोदरच फलकांची मोडतोड
कन्नड व्यतिरिक्त अन्य भाषेत असलेले व्यापारी आस्थापनांचे फलक दुकाने उघडण्या अगोदरच काढण्याची किंवा त्या फलकांची मोडतोड करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे.
शहरातील अनेक भागात आज महानगरपालिकेचे कर्मचारी फलक हटवण्यासाठी आवश्यक ते साहित्य घेऊन दाखल झाले होते. साठ टक्के कन्नड मजकूर नसलेले फलक सकाळपासून हटवण्यास प्रारंभ करण्यात आला.शहरातील काही भागात फलक हटवण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना दुकान मालकांनी जाब विचारल्यावर त्यांना उत्तर देता आले नाही आणि त्यांनी तेथून काढता पाय घेतला.शहरात फलक हटवण्यास विरोध होणार हे ध्यानात घेऊन महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सकाळीच फलक हटवण्यास प्रारंभ केला.कर्नाटक सरकारने कन्नड फलक लावण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून दिला होता.तो कालावधी देखील आज संपत असल्याने महानगरपालिका कर्मचारी फलक हटवण्यास आक्रमक झाले आहेत.