अवकाळी पावसाने बेळगाव शहराला एक तासाहून अधिक काळ झोडपून काढले.सकाळपासून उष्म्यात कमालीची वाढ झाली होती.अचानक जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली आणि त्याच वेळी ढगांचा गडगडाट सुरू झाला.प्रारंभी पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आणि काही वेळाने जोरदार पावसाला सुरुवात झाली.एक तासाहून अधिक काळ पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
सध्या लग्न सराई सुरू असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसामुळे खरेदीसाठी बेळगावला आलेल्या लोकांची तारांबळ उडाली.रस्त्यावर बसून भाजीपाला आणि अन्य साहित्य विकणाऱ्या विक्रेत्याची साहित्य आवरताना गडबड उडाली. गटारींची साफसफाई झालेली नसल्याने अनेक भागात गटारीतील पाणी रस्त्यावर वाहून आले.पावसामुळे रस्त्यावरील आणि बाजारपेठेतील वर्दळ ठप्प झाली होती.उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला पावसामुळे दिलासा मिळाला.