*बेळगाव बिलाँग्ज टू महाराष्ट्र संघटनेचा समितीच्या दोन्ही लोकसभा उमेदवारांना जाहीर पाठिंबा.*
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने घोषित केलेल्या बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघासाठीच्या दोन्ही उमेदवारांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या बेळगाव बिलोंग्ज टू महाराष्ट्र संघटनेचा एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
मराठी माणसाची एकजूट कायम राहावी व लढ्याला वाचा फुटावी म्हणून समितीने आजवर अनेक निवडणुका लढविल्या आहेत. तसेच समितीचा कार्यकर्ता हा लढ्याशी बांधील रहावा म्हणून आपण लोकसभा निवडणूक लढवत आहोत. अन्यथा मराठी माणसाला फसवून राष्ट्रिय पक्ष मराठी लोकांमध्ये दुफळी पसरविण्याचा प्रयत्न करत असतात. याचाच बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मैदानात उतरविले आहे. अश्यावेळी मराठी भाषेप्रती आपली प्रामाणिकता आणि निष्ठा जपण्यासाठी मराठी जनतेने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान करणे गरजेचे आहे. कर्नाटकातील मराठा सह बहुजन वर्गातील समाजाला डावलून फक्त काही विशिष्ठ लोकांची मक्तेदारी निर्माण केली जात आहे.
नुकत्याच कर्नाटक सरकारने प्रसिद्ध केलेल्या जात जनगणनेच्या अहवालात मराठा समाजाचा उल्लेख देखील करण्यात आला नाही. याचाच अर्थ फक्त निवडणुकांमध्ये मराठी आणि मराठा समाजाचा वापर केला जात आहे. त्यामुळे भविष्यात याचे गंभीर परिणाम सीमाभागातील जनतेला भोगावे लागू नयेत यासाठी सर्व मराठी सह मराठा व इतर बहुजन वर्गातील समाजाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन बेळगाव बिलाँग्ज टू महाराष्ट्र संघटनेतर्फे करण्यात आले आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री महादेव पाटील तसेच कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री निरंजन सरदेसाई यांनाच प्रचंड मतांनी निवडून देण्यात यावे व मराठी माणसाची एकजूट कायम राखावी असे आवाहन करण्यात आले आहे.