खानापूर : मराठी शाळा आणि आपली संस्कृती टिकली तरच पुढील काळात सीमाभागात मराठी भाषिकांचे अस्तित्व टिकणार आहे त्यामुळे समितीच्या उमेदवाराला मतदान करुन आपले कर्तव्य पार पाडा असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले आहे.
कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी गुरुवारी हलशीवाडी, गुंडपी, हलशी, नंदगड आदी भागात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी हलशीवाडी येथील जुनी मराठी शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी चंद्रकांत देसाई यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समितीचा लढा सुरू आहे तरीही दिवसेंदिवस कन्नडची सक्ती वाढवली जात आहे तसेच वेगवेगळ्या माध्यमातून येथिल भाषा आणि संस्कृती संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आपली भाषा टिकविण्यासाठी आपणच पुढाकार घेणे आवश्यक असून कारवार लोकसभा मतदार संघाचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या ओळखीच्या मतदारा पर्यंत पोहचत समितीला अधिक प्रमाणात मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.
आबासाहेब दळवी यांनी हलशीवाडी गाव नेहमीच समितीचा बालेकिल्ला राहिला असून अनेक निवडणुकांमध्ये गावाने समितीच्या पाठीशी राहून उमेदवारांना विजयी केले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही गावातून अधिक प्रमाणात मतदान व्हावे यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सर्वच भागातून पाठींबा मिळत आहे मात्र लोकसभा मतदार संघाचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी जाऊन पोहचता येत नाही त्यामुळे कार्यकर्त्यानी प्रचाराची जबाबदारी घ्यावी असे मत व्यक्त केले.
उमेदवार सरदेसाई यांनी अनेकजण स्वार्थासाठी मराठी भाषेशी गद्दारी करीत आहेत मात्र मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलो आहे प्रत्येक गावाने आपल्या मायबोलीच्या रक्षणासाठी पूढे यावे आणि समितीला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.बाळासाहेब शेलार, रणजीत पाटील, उमेश देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीच्या माजी ग्राम पंचायत सदस्य अशोक देसाई, हलशी पीकेपीएसचे माजी अध्यक्ष सुधिर देसाई, नरसिंग देसाई, नारायण देसाई, यल्लाप्पा देसाई, कृष्णाजी देसाई, पुंडलिक देसाई, काका देसाई, प्रशांत देसाई, बबन देसाई, नागेश भोसले, अनिल देसाई, महेश गुरव, सुनिल पाटील, रोहन देसाई आदी उपस्थित.