बुधवारी रात्री झालेल्या कार आणि टीप्पर अपघातात दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
देवगिरी बंबरगा क्रॉस येथे हा अपघात घडला.नातेवाईकांचे लग्न आटोपून कारमधून परत जात असताना टीप्पर आडवा आल्याने हा अपघात घडला.यावेळी टिप्परच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन आग लागली आणि त्यात दोन जण होरपळून मृत्युमुखी पडले.कारमधून प्रवास करणाऱ्या अन्य दोघांना स्थानिकांनी बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मारुती बेळगावकर (२४ ) आणि समीक्षा डोयेकर (१२) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.अपघाताचे वृत्त कळताच अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.अपघात झाल्यावर टिप्पर चालकाने पळ काढला आणि काकती पोलीस स्थानकात हजर झाला.