बेळगाव : एका महिलेची दोन तोळ्यांची सोनसाखळी लांबविल्याचा प्रकार शनिवारी (दि. ११) सकाळी सहाच्या सुमारास बेळगावात उघडकीस आला. तपासानंतर हे तरुण इराणी टोळीतील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे, तब्बल सात वर्षानंतर बेळगावात पुन्हा इराणी टोळी सक्रिय झाली असून त्यांनी दहशत निर्माण केली आहे.
बंद घरे, दुकाने फोडण्यात तरबेज असलेली इराणी टोळी रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांचे दागिने लांबविण्यासह पोलिस असल्याचे सांगत लक्ष विचलित करुन मौल्यवान वस्तू लंपास करण्यात तरबेज आहे. सात वर्षांपूर्वी बेळगावात पुणे परिसरातील इराणी टोळीने धुडगूस घातला होता. आठवड्यातून तीन-चार चेनस्नॅचिंग, एक-दोन घरफोड्या व एखादी लक्ष विचलीत करुन लुबाडल्याची घटना घडत होती. तत्कालीन पोलिस आयुक्त एस. रवी यांच्यासमोर या टोळीला पकडण्याचे मोठे आव्हान होते. पाच पथके संपूर्ण महाराष्ट्रभर फिरुन आली तरी हाती काहीच लागले नव्हते. परंतु,बेळगावातून पळून जाताना पोलिसांनी पाठलाग करुन चौकडीला अटक केली. यातील एकाने पोलिसांवर गोळीबार केला होता. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक इराणी तरुण जखमी झाला होता. शिवाय तत्कालीन पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकरही जखमी झाले होते. त्यावेळी पोलिसांनी सखोल तपास करत नऊजणांना अटक केली होती. त्यानंतर अनेक वर्षे इराणी टोळी बेळगावातून गायब होती. परंतु, शनिवारी अशोकनगर परिसरात केलेले चेनस्नॅचिंग इराणी टोळीकडून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर वा घरासमोर झाडलोड करताना पत्ता विचारण्यासाठी येणाऱ्या तरुणांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सकाळी वा सायंकाळी अंधाराचा फायदा घेऊन चेनस्नॅचर्स आपल्या आजूबाजूला फिरत असतात. तुम्ही एकटे असताना ते बरोबर हेरुन दागिने लांबवून पळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जनतेने सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.