भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकरा मोराना विष घालून मारल्याची घटना उघडकीस आली असून वन खात्याने या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
चिकोडी तालुक्यातील मांजरी गावात कृष्णा नदीच्या काठावर ही घटना घडली आहे.मांजरी परिसरातील शेतात मोठ्या संख्येने मोर पाहायला मिळतात.नदी काठावरील शेतात एक दोन नव्हे तर अकरा मोर मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.याची माहिती वन खात्याला दिल्यावर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.नंतर मोरांचे मृतदेह वन खात्याने ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.यावेळी चौकशीत मोराना मक्यातून विष घालून मारल्याचे उघडकीस आले.
वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मंजुनाथ पवार या वीट कामगाराला अटक केली.चौकशीत त्याने आपणच मोराना मक्यातून विष घालून मारल्याची कबुली दिली.मंजुनाथ पवार हा गुलबर्गा तालुक्यातील झळकी गावचा असून तो वीट भट्टीवर काम करण्यासाठी आला होता.मोराचे मांस खाण्यासाठी आपण मोराना विष घालून मारल्याची कबुली दिली.मंजुनाथ पवार याला अटक करून वन कायदा अंतर्गत राष्ट्रीय पक्ष्यांची हत्या केल्याचा आरोप ठेऊन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.त्याला नायालयात हजर करून नंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे .पशू चिकित्सक विनायक पाटील यांनी पाहणी केल्यावर मोरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.