बेळगाव – आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमात आपल्या जीवनाचा उत्तरार्थ व्यतीत करत असलेल्या आजी-आजोबांनी चार दिवस अक्षरशा जीवाची मुंबई केली.बेळगाव- मुंबई-बेळगाव विमानाने प्रवास आणि चार दिवसात मुंबईतील धार्मिक आणि महत्त्वाच्या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट, त्याचबरोबर सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीचे दर्शन अशी ही आगळी वेगळी सहल त्या आजी आजोबांच्या जीवनातील संस्मरणीय सफर ठरली.
गेली 30 वर्ष शांताई वृद्धाश्रमाचे काम कोणत्याही शासकीय अनुदानाविना केवळ दानी व्यक्तींच्या सहकार्यातून केले जात आहे. मुंबईचे उद्योजक अनिल जैन यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील कामाने प्रभावी झालेल्या अनिल जैन यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मुंबई दर्शनासाठी आमंत्रित केले.यासाठी अनिल जैन यांनी 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान मुंबई दर्शनाची संपूर्ण व्यवस्था ही केली.अनिल जैन यांच्या नियोजनाने प्रभावित झालेल्या शांताई वृद्धाश्रमाचे संचालक आणि पत्रकार राजू गवळी,पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे व माजी महापौर आप्पासाहेब पुजारी यांनी बेळगावचे व्यापारी निलेश बागी यांच्याशी संपर्क साधून मुंबईला जाणाऱ्या आजी-आजोबांना हवाई सफर करण्यासाठी प्रयत्न केले. या कामी स्टार एअर चे मालक संजय घोडावत यांचे सहकार्य लाभले. संजय घोडावत यांनी शांताई च्या आजी आजोबांना हवाई सफर घडविण्यासाठी सहकार्य केले.
22 ते 26 फेब्रुवारी दरम्यानच्या मुंबई दर्शनादरम्यान शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे पहिल्या दिवशी हॉटेल ताज मध्ये हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. 32 सदस्य असलेल्या आजी आजोबांच्या स्वागतासाठी ताज ग्रुपच्या वतीने स्वागतासाठी 21 जणांचा ताफा तैनात केला होता. ताज हॉटेलचे एक्झिक्युटीव्ह शेफ नितीन एम.आजी आजोबांच्या स्वागतासाठी स्वतः जातीने उपस्थित होते. त्यांनी शांताई च्या आजी-आजोबांसोबत आपुलकीने संवाद साधला. त्यांना भेटून आपले आई वडील भेटल्याचा आनंदही व्यक्त केला. हॉटेल ताज मध्ये आजोबांनी ताज्या हाय-टीचा आस्वाद घेतला. त्यानंतर जुहू चौपाटीला भेट देऊन तेथील इस्कॉन मंदिरात भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले.
मुंबई दर्शना दरम्यान गोएंका भवन येथे निवासाची सोय करण्यात आली होती. मुंबई दर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सी-लिंकसी-लिंक मार्गे सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिराला भेट देण्यात आली.गिरगाव चौपाटी, विधान भवन, नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया पाहून शांताईच्या आजी-आजोबांनी समुद्रात बोटिंगचा आनंद लुटला.
बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरला भेट दिली असता तेथिल फौंटन ऑफ जॉय शो पाहून सारे जण चकित झाले.भव्य आर सिटी मॉल पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. येथील स्नो वर्ल्डला ही त्यांनी भेट दिली. खमंग खाद्यपदार्थांचा आस्वादही लुटला. या ठिकाणीही आर सिटी मॉल च्या वतीने आजी-आजोबांच्या व्यवस्थेबाबत विशेष काळजी घेण्यात आली. अहमदनगरचे ह.भ.प.पारस महाराज मुथा यांच्या सत्संग कार्यक्रमात आजी-आजोबा सहभागी झाले. पारस महाराजांनी आजी-आजोबांना जीवनाचे सार पटवून दिले.
मुंबई दर्शना दरम्यान शांताईच्या आजी आजोबांना सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम व ओंकार भोजने यांच्या ‘करून गेलो गाव’ नाट्यप्रयोगाला हजर राहण्याची संधी मिळाली. तुफान विनोदी नाटक पाहण्याबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांच्याशी संवाद साधता आला. दोन्ही अभिनेत्यांनी शांताईच्या आजी आजोबांची भेट घेऊन, आपले वडीलधारी भेटल्याचा आनंद व्यक्त केला. मुंबई दर्शना दरम्यान प्रत्येक ठिकाणी शांताईच्या आजी-आजोबांचे मुंबईकरांनी स्वागत केले.शांताईच्या संचालकांनी चालविलेले कार्य आणि मुंबई दर्शनासाठी दानशूर व्यक्तिमत्त्व अनिल जैन यांनी केलेल्या सेवाभावी व्यवस्थेबाबत सर्वांनी कौतुक केले.
शांताईतील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या मुंबई दर्शन सफरी दरम्यान वृद्धाश्रमाचे संस्थापक विजय पाटील, कार्याध्यक्ष आणि माजी महापौर विजय मोरे,भगवान वाळवेकर,संतोष ममदापूर, वसंत बालीगा,नागेश चौगुले,ऐलन मोरे,मारिआ मोरे,विजया पाटील, म्हैसूरचे प्रसाद यांनी संपूर्ण मुंबई दर्शन दौऱ्या दरम्यान आजी-आजोबांच्या विशेष काळजी घेतली.