बेळगाव सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शहराचे नूतन पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांचे शहरातील समस्त गणेश भक्तांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बेळगावचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे गेल्या 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी इडा मार्टिन मार्बलिंग यांची नियुक्ती झाली आहे. नुकतीच त्यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतल्यामुळे सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी पोलीस आयुक्तालयात त्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन पोलीस आयुक्त मार्टिन यांचा सत्कार करून शहरात त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी पोलीस आयुक्तांची उपस्थित पदाधिकाऱ्यांशी ओळख करून दिली. सत्काराबद्दल आभार मानून पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी आपल्या पुढील कारकीर्दीसाठी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कलघटगी यांनी बेळगाव शहरातील गणेश उत्सव कशाप्रकारे संघटितपणे भव्य प्रमाणात साजरा केला जातो. उत्सवाची तयारी, विसर्जन मिरवणूक वगैरे बाबींची पोलीस आयुक्तांना माहिती दिली. तेंव्हा सुवर्ण विधानसौध येथील सरकारच्या अधिवेशन काळात बंदोबस्तासाठी यापूर्वी आपण 3 -4 वेळा बेळगावला आलो होतो. त्यामुळे या शहराची मला थोडीफार माहिती आहे, असे आयुक्त मार्टिन यांनी सांगितले.
याप्रसंगी श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, उपाध्यक्ष सतीश गोरगोंडा, सागर पाटील, राजेंद्र हंडे, दत्ता जाधव, अजित कोकणे, शिवराज पाटील, गणेश दड्डीकर, सुधाकर चाळके, शिंदोळकर, उदय पाटील आदी उपस्थित होते.