नवी दिल्ली, 27: “झुकणारी ना मान दिली, ना लवणारा कणा दिला….. मराठमोळ्या मनामनाला आकाशाचा मान दिला… कवी जीवन तळेगावकर यांच्या या गौरवास्पद कवितेने तसेच त्यांच्या स्वरचित कवितांनी, मराठी भाषा गौरव दिन आज साजरा करण्यात आला.
प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्कार मानकरी, वि.वा. शिरवाडकर अर्थात “कुसुमाग्रज” यांच्या जयंती निमित्त शासनाद्वारे साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिध्द कवी व लेखक श्री जीवव तळेगावकर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. उपसंचालक (मा.) श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री तळेगावकर यांचे रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री तळेगावकर व उपसंचालक (मा.) श्रीमती अरोरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा राज्यभिषेक वर्ष असल्याने त्यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून नम्र अभिवादन केले. तद्नंतर वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले. कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचा-यांनीही यावेळी पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात श्री तळेगावकर यांनी त्यांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर तसेच ‘रोखठोक’ या स्वरचित कवितांचे प्रस्तुतीकरण केले. यासोबतच त्यांनी आपले कांही अनुभवही कथन केले. कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याच नावाने असलेला कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचा साहित्यभूषण पुरस्कार श्री तळेगावकर यांना प्राप्त झाल्याचे तसेच नाशिक येथे त्यांच्या तरूण वयात वि.वा. शिरवाडकरांसोबत भेटीचे योग प्राप्त झाल्याचे, श्री तळेगावकर यांनी आपल्या समृध्द आणि संस्मरणीय अनुभवाची भावना व्यक्त केली. आपल्या बोली भाषेचा न्यूनगंड न बाळगता त्या-त्या भाषेतून व्यक्त होण्याची आवश्यकता, तसेच विविध राज्यांतील भाषांचे आदान-प्रदान व्हावे, ज्याने भाषा समृद्ध होतील असेही ते म्हणाले. उपसंचालक श्रीमती अरोरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन केले.