बेळगाव : आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळांची माहिती संग्रहित करुन ती प्रसिद्ध करण्याची सूचना शालेय शिक्षण आयुक्त बी. बी. कावेरी यांनी सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे.
माहिती संग्रहित करुन आपल्या कार्यालयाबाहेर लोकांना समजेल अशा स्वरुपात ती प्रसिद्ध करावी. शाळेचे नाव, माध्यम, पाठ्यक्रम, पत्ता अशी विविध माहितीही असावी.
काही ठिकाणी सरकारच्या परवानगीविना शाळा चालवल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे. अशा शाळांना रितसर नोंद करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात यावी. राज्याने ठरवलेल्या अभ्यासक्रमाऐवजी केंद्रीय अभ्यासक्रम लागू करणे, नोंद केलेल्या माध्यमाऐवजी इतर माध्यमात अध्यापन करणाऱ्यांना ४५ दिवसांची मुदत द्यावी.
अनधिकृतपणे अतिरिक्त वर्ग चालवणाऱ्यांना त्याबाबत शिक्षण खात्याला कळवण्याची समज द्यावी. खात्याच्या परवानगीविना शाळेचे स्थलांतर किंवा हस्तांतर केले असेल तर संबंधितांना कळवून परवानगी घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.
गतवर्षीही अशा प्रकारची सूचना शिक्षण आयुक्तांनी दिली होती. पाहणी केल्यानंतर सुमारे १,६०० शाळा अनधिकृतपणे चालवण्यात येत असल्याचे दिसून आले होते. पण, त्यांची माहिती जाहीर करण्यात आली नाही.