बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमाच्या पंचविसाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने एक आगळावेगळा सोहळा शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यात पार पाडला. गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धूमे लिखित शांताई या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी एक एप्रिल रोजी साखर कारखान्याच्या प्रांगणात झाले. ज्येष्ठ पत्रकार दैनिक सकाळचे मुख्य संपादक उत्तम कांबळे, पाटोदा चे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पेरे पाटील, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील आणि जलविरादरी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पाणी बचावासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सिंह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा कार्यक्रम झाला.
प्रारंभी लेखक पत्रकार सुभाष धुमे यांनी शांताई च्या एकंदर कार्याची ओळख करून देताना या कार्यामुळे आपण स्वतः प्रभावित झालो असून या कार्याची दखल घेण्यासाठी रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हे पुस्तक लिहिले असल्याची माहिती दिली. कार्याध्यक्ष विजय मोरे आणि चेअरमन विजय पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षात झालेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी आपल्या भाषणात मांडला. यानंतर प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे कौतुक करताना पत्रकार उत्तम कांबळे यांनी या प्रकारच्या कार्याची खरोखरच दखल घेण्याची आवश्यकता असून पत्रकार सुभाष धुमे यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. वृद्धाश्रम असावेत की नसावेत हा वादाचा मुद्दा जरी असला तरी तो तात्विक वादाचा असून निराधार वृद्धांना आश्रय देणारे शांताई सारखे आश्रम गरजेचेच आहेत अशी भूमिका त्यांनी मांडली.
दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी विजय मोरे यांच्या शांताई च्या बरोबरीनेच इतर कामाचेही कौतुक केले. रद्दीच्या माध्यमातून बुद्धीकडे नेण्याचा प्रवास 413 विद्यार्थ्यांना 46 लाखातून केलेली मदत आणि इतर अनेक उपक्रमाबद्दल त्यांनी यावेळी कौतुक केले.
शेवटी कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी एकंदर उपक्रमाबद्दल आभार मानले. दिग्गज व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या कार्याची प्रशंसा होतानाच पुस्तकाचेही प्रकाशन झाले असून त्या पुढील काळात आणखी मोठे कार्य करण्याचे बळ या माध्यमातून मिळाले असल्याचे विजय मोरे यांनी यावेळी सांगितले.
बामणवाडी ग्रामपंचायतचे सदस्य पुंडलिक पायांनाचे पत्रकार प्रसाद सु प्रभू, विजय मोरे यांचे सुपुत्र आणि यंग बेळगाव फाउंडेशनचे ॲलन मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.