बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या 7 वर्षापासून वृक्षांची लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य करणाऱ्या ग्रीन सेव्हीयर्स असोसिएशनतर्फे काल रविवारी सुट्टीच्या दिवशी झाडांची सुमारे 400 रोपटी लावण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.
ग्रीन सेव्हीयर्स असोसिएशन ही संघटना गेल्या 10 एप्रिल 2016 पासून बेळगाव शहर परिसरामध्ये झाडे लावण्याचे आणि त्यांचे संवर्धन करण्याचे आदर्शवत कार्य करत आहे. सदर संघटनेतर्फे काल रविवार सुट्टीच्या दिवशी वृक्षारोपण उपक्रम राबवून विविध प्रकारच्या 400 झाडांची रोपे लावण्यात आली. या उपक्रमात संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांसह केएलएस जीआयटी, केएलई इंजीनियरिंग, केएलई इंटरनॅशनल स्कूल, अंगडी इंटरनॅशनल स्कूल आणि व्हिजन फ्लाय एव्हिएशनचे विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ग्रीन सेव्हीयर्स असोसिएशन आपले झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य यापुढेही सुरूच ठेवणार आहे. याबरोबरच येत्या काळात कृषी वनीकरणामध्ये विविधता आणणे, जैवविविधता उद्यानाची निर्मिती आणि हरित चर्चेच्या माध्यमातून जागृतीचे कार्य देखील करणार आहे. हवामानातील बदल, पाण्याचा तुटवडा आणि वाढत्या प्रदूषणामुळे बेळगाव शहर आणि परिसरातील हरित अच्छादन वृद्धिंगत होणे अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही कार्यरत आहोतच, मात्र यामध्ये शहरवासीयांनी देखील आम्हाला आमच्या प्रयत्नात सहकार्य करावे असे आवाहन ग्रीन सेव्हीयर्सने केले असून आपल्या भावी पिढीच्या सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि आनंदी भविष्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे स्पष्ट केले आहे.