बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांदा दरात ५०० रुपयांनी वाढ झाली. एपीएमसीत कांदा दर प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये होता. गत आठवड्यात कांदा दरातही मोठी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला नाही. आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात पुन्हा वाढ पहायला मिळाली. बाजारात सुमारे ५० गाड्या कांदा दाखल झाला होता.
महाराष्ट्रातील लहान कांदा १४०० ते १६०० रुपये, मध्यम कांदा १६०० ते दोन हजार रुपये व मोठा कांदा १८०० ते २२०० रुपये दराने उपलब्ध होता. गत बाजारात कांदा १६०० रुपये होता. तसेच, आवकही ११० गाड्या झाली होती. मात्र, आज आवकही कमी झाली. सोलापूर, तुळजापूर या भागातील हा कांदा आहे.
बाजारात इंदूर, तळेगाव भागातील बटाटे दाखल झाले होते. इंदूर बटाट्याच्या १० गाड्या दाखल झाल्या असून, त्याचा दर १८०० ते १९०० रुपये होता. तसेच, पुणे (तळेगाव) येथील चार गाड्या दाखल झाल्या असून, त्याचा दर १५०० ते १८०० रुपये होता.
रताळी दरही मोठ्या प्रमाणात घसरला असून दर ३०० ते ७०० रुपये होता. रताळ्यांना कीड लागल्याने दरात घट झाली आहे.