‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने खानापूर तालुक्यातील अतीदूर्गम भागातील जामगाव गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत. –
विश्वरत्न, क्रांतीसुर्य, ज्ञानसूर्य, अशी कितीही विषेशणे फिकी पडावी, अशा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या संविधानाचे निर्माते, भारतीय राज्य-घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती खानापूर तालुक्यातील दुर्गम अशा जामगाव गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्ते सागर सुतार, विकी मेहता, डॉ. राजश्री अनगोळकर, डॉ. अनगोळकर, अनंत देसाई, मदन सरदेसाई, युवराज भोसले (स्पोर्ट्समन- फुटबाॕल), अथर्व सुतार, धीर मेहता – छोटे कार्यकर्ते व पप्पू गांवकर हे कार्यक्रमाला प्रमुख अतीथी म्हणून लाभले होते.
मान्यवरांनी भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन 133 वी जयंती साजरी करण्यात आली. व दिपपुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. शाळेमार्फत प्रतिष्ठित गावकऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थीनींनी स्वागतगीत म्हणून मान्यवरांच्यासह सर्व गावकऱ्यांचेही स्वागत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर सुतार व सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 6 वह्या, पेन्सिली, पट्टी, खोडरबर व शापर्नर असे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपचे समर्थक व समाजातील एक दानशूर व्यक्ती मुरलीधर सुतार यांच्या स्मरणार्थ आयोजिला होता. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना साहित्य पुरविण्याबरोबरच, गावातील उरलेल्या व काही बाहेरगावहून येथे आलेल्या विद्यार्थ्यांना देखील आमच्या संस्थेचे छोटे कार्यकर्ते अथर्व सुतार व धीर मेहता यांनी उत्साहाने घरोघरी फिरून हे शैक्षणिक साहित्य वाटले. हे शैक्षणिक साहित्य त्यांनाही मिळाल्याने कार्यक्रम बघणारे ते विद्यार्थ्यीही आनंदीत झाले.
‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने तळागाळातील खानापूरच्या भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या निबीड जंगलातील अतीदुर्गम भागात राहणाऱ्या जेथे सरकारी सुविधांची वानवा आहे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवून ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत सामाजिक कार्य करून खऱ्या अर्थाने ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर’ यांची जयंती साजरी केली.
मुख्याध्यापक संदीप मदभावे यांनी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक केले, डॉ राजश्री अनगोळकर यांनी विद्यार्थ्यांना खूप मौल्यवान असे मार्गदर्शन केले व राहुल पाटील यांनी ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्याविषयी माहिती दीली. तसेच भविष्यात गावातील विद्यार्थ्यांसाठी क्रिडा साहित्य देण्याचे कबूल केले. सोबतच दहावीनंतरच्या गरीब मुलींना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करू असे सांगितले. गावकऱ्यांनासाठी सेंद्रिय शेतीचे शिबीर, वैद्यकीय शिबीराद्वारे आरोग्यासंदर्भात जागृती करण्याचे कबूल केले.
मुख्याध्यापकांनी शाळेच्या वतीने ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांऱ्यांचे आभार मानले. यावेळी शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, शाळा सुधारणा कमीटीचे सदस्य, ग्राम पंचायत सदस्य व प्रतिष्ठित गावकरी उपस्थित होते.