राष्ट्रवीरकार शामराव देसाई स्मृती पुरस्कार भारत पाटणकर यांना जाहीर
पत्रकारिता, शिक्षण, सहकार व समाज सुधारणा क्षेत्रात भरीव कार्य केलेले राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या स्मृतप्रीत्यर्थ देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार कासेगाव, ता. वाळवा, जिल्हा सांगली येथील पुरोगामी विचारवंत, लेखक व कष्टकरी जनतेचे नेते काँम्रेड भारत पाटणकर यांना जाहीर झाला आहे.
राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी होते. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे.
पुरस्कार वितरण प्रती वर्षाप्रमाणे 4 डिसेंबर रोजी व्हावयाचे होते. पण त्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. यामुळे हा सोहळा सोमवार दि. 11 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता ज्योती महाविद्यालय, क्लब रोड येथे होणार आहे.
समितीचे अध्यक्ष व कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असून त्यांच्याच हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.