मुलाने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी तगादा लावल्याने आईने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.बैलहोंगल तालुक्यातील भैरनट्टी गावात ही घटना घडली आहे.आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव पार्वतेव्वा सोमप्पा मुतणाळ असे नाव आहे.
पार्वतेव्वाच्या मुलाने गाई खरेदी करण्यासाठी एका बँकेतून दोन लाख रू कर्ज घेतले होते.त्या कर्जाचे आठ हप्ते त्याने नियमित भरले होते.नववा हप्ता थकल्याने बँकेचे अधिकारी त्याच्या वसुलीसाठी घरी पोचले.बँक अधिकाऱ्यांनी पार्वतेव्वा हिला बँकेचे हप्ते भरण्या बाबत धमकावले.त्यावर पार्वतेव्वा हिने कामानिमित्त मुलगा गावाला गेला असून परत आल्यावर तो हप्ता भरेल असे सांगितले.तरी देखील बँकेच्या अधिकाऱ्यांनी महिलेला धमकावून भीती घालण्यास सुरुवात केली.त्यावर पार्वतेव्वा हिने तुम्ही त्रास दिला तर मी विष प्राशन करेन असे बँक अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यावर बँक अधिकाऱ्यांनी तू विष पिऊन जीवन संपवल्यवर तर तुझ्या मुलाला घरी यावेच लागेल असे उर्मट उत्तर दिले.त्यामुळे पार्वतेव्वा हिने विषाची बाटली घेऊन प्राशन केले.त्या नंतर एकच गोंधळ उडाला.लगेच विष प्राशन केलेल्या महिलेला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असून आता तिची तब्येत धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणी नेसरगी पोलीस स्थानकात दोन बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.