संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा चौक येथे सकाळी हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्या नंतर शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली.फेरीत मराठी भाषिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे अशी जोरदार घोषणाबाजी मराठी भाषिकांनी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर चिटणीस मालोजीराव अष्टेकर,राजाभाऊ पाटील,माजी उप महापौर रेणू किल्लेकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
भाषावार प्रांतरचना झाल्यावर मराठी भाषिक भूभाग कर्नाटकात जोडल्यामुळे मराठी भाषिकात तीव्र असंतोष निर्माण झाला आणि ठिकठिकाणी मराठी भाषिकांनी आंदोलने केली.यावेळी बेळगाव आणि निपाणीत पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांनी हौतात्म्य पत्करले.मुंबईत झालेल्या गोळीबारात ६७ शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करले होते.