आपल्या बेळगांवच्या उत्तरेकडील परिसरात असणाऱ्या बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी व गोरामहट्टी या भागामध्ये डाॕ. शिवाजी कागणीकर (दादांनी) 2000 साली केलेला “पाणलोट प्रकल्प” पाहण्यासाठी धारवाडच्या वाल्मी (VALMI) संस्थेमार्फत मेघालय, पश्चिम बंगाल व राजस्थान येथून जवळपास 45/50 प्रशिक्षणार्थी आरएफओ (RFO), धारवाडचे वनाधिकारी तसेच वाल्मी संस्थेचे अधिकारी आले होते.
बंबरगा गावाशेजारी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे त्याच्या शेजारचा परिसर हिरव्यागार वनराईत बदललेला आहे, सभोवतालच्या डोंगराळ भागात पाणी मुरवण्यासाठी उतारावर चरी मारल्या, त्या चरींच्या शेजारी स्थानिक प्रजातींची रोपे लावल्याने पावसाचे पडलेले पाणी चरींच्यामार्फत जमिनीत साठून लावलेल्या रोपांची गर्द झाडीत रूपांतर होऊन ती झाडे आज सर्वांना फळफळावळे देत आहेत तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने तलावांत आणि विहिरीत बारमाही पाण्याच्या साठा आजच्या काळात उपलब्ध असलेला दिसत आहे. त्याचे सर्व श्रेय बेळगांवचे जेष्ठ समाजसेवक व पर्यावरण तज्ञ डाॕ. शिवाजी कागणीकर (दादा) यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत. त्यांनी या आजुबाजूच्या गावच्या लोकसहभागातून जो पाणी अडवा पाणी जिरवा प्रयोग राबविला आहे त्या कामामुळे हा बदल घडलेला आहे.
1995 पुर्वी बेळगांव तालुक्याच्या या उत्तरेकडील भागात प्रथमतः पाण्याचे खूप दुर्भिक्ष होते त्यामुळे येथील डोंगराळ परिसर हा ओसाड व भकास वाटायचा, परिणामी येथील भागातील शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पन्नही कमी होते, पाणी नसल्याने चाऱ्याअभावी शेतकऱ्यांना दुभती जनावरे पाळता येत नव्हती, म्हणूनच या परिसरातील गावांमध्ये इतर गावचे लोक सोयरीक (लग्नास) जोडण्यासाठी आपल्या मुली देण्यास धजावत नव्हते, पण शिवाजी दादांनी लोकसहभागातून 2000 सालानंतर केलेल्या येथील पाणलोट प्रकल्पाच्या प्रयोगानंतर येथील परिस्थिती बदललेली आहे, या (पाणी – अडवा – पाणी जिरवा – फळझाडे लावा) मोहिमेनंतर पडलेल्या पावसाचा जमिनीत निचरा होऊन पाण्याचा मुबलक साठा झाला आहे.
शेतीसाठी, जनावारांना चारा व पिण्यासाठी सर्वांना पाणी कायम उपलब्ध झाले आहे.
शिवाजी दादांनी हा पाणलोट प्रकल्प करताना सरकारी मदतीची अपेक्षा न करता लोकसहभातून बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी व गोरामहट्टी या गावपरिसरातील डोंगराच्या उतारावर चरी मारल्या शेजारी स्थानिक फळझाडे लावली कारण फळझाडांचे उत्पन्न भविष्यात गाववाल्यांना मिळावे व भविष्यकाळात त्यांच्या उत्पन्नात भर पडावी.
बंबरगा गावालगत दोन डोंगरांच्या मधील भागाचा योग्य उपयोग करून लोकसहभातून बंधारा बांधला, त्यामूळे पडलेल्या पावसामुळे भुजलपातळीत वाढ होऊन खालील गावभागात विहिरी पाण्याने भरलेल्या आहेत. कट्टनभावी गावात दोन तलाव व विहिरी लोकसहभागातून खोदल्या, शेजारच्या डोंगर उतारावर झाडे लावल्याने तेथेही जमिनीत पाणी मुरले व तलावात कायम पाणी उपलब्ध झाले. तसेच शेजारील विहिरीत फक्त आठ फुटावर बारमाही पाणी उपलब्ध असलेले आजही दिसते. गोरामहट्टी व निंगेनहट्टी भागातसुद्धा दोन-दोन तलाव व विहीरी तयार केल्याने त्या गावातीलही पाण्याचे दुर्भिक्ष संपलेले आहे.
शिवाजी दादांनी अगदी तरूणांनाही लाजवेल अशा उत्साहाने प्रशिक्षणार्थीं RFO ना येथील लावलेली झाडे (2,00,000 झाडे आजही मोजता येतात), बंधारा, तलाव, विहिरी व गोबरगॕस प्लँटचा परिसर फिरून दाखवत त्याचे महत्त्वही सांगितले. शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींनी सॕलूट करत डाॕ. शिवाजी कागणीकर यांचे आभार मानले. आपला बेळगांवचा वाॕटरशेड मॕनेजमेंट प्रोजेक्ट पाहण्यासाठी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी आभार मानले,
यावेळी वाल्मी(VALMI) संस्थेचे सहाय्यक ट्रेनर फकिरेश अगडी, धारवाड वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते.