बेळगावातील प्रभाग क्र. १० मध्ये विविध विकासकामांचा बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते आज प्रारंभ करण्यात आला.
बेळगाव महापालिकेच्या हद्दीतील नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या प्रभाग क्र. १० मधील मुजावर गल्ली परिसरात आज विकासकामांना प्रारंभ कऱण्यात आला. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते कामांना आज चालना देण्यात आली. यात गटारी, सीडी वर्क आदी कामांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले की, या भागातील समस्या सोडविण्याची विनंती येथील रहिवाशांनी केली होती. त्यानुसार येथे पाहणी करून सरकारकडून या कामांसाठी निधी मंजूर करवून घेतला आहे. आज या कामांना प्रारंभ करण्यात येत आहे. कंत्राटदार चौगुले यांना याचे कंत्राट देण्यात आले असून, त्यांना कामे दर्जेदार करण्याची सूचना करण्यात आली आहे. या प्रभाग क्र. १० मध्ये ड्रेनेज व अन्य काही कामेही करावयाची आहेत. ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सिद्धार्थ भातकांडे यांनी सांगितले की, आमच्या प्रभागातील अनेक समस्या सोडविण्यासाठी रहिवाशांनी आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी लगेचच मागणीची दखल घेऊन कामांना प्रारंभ केला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
यावेळी प्रभाग क्र. १० मधील रहिवाशांच्या वतीने सिद्धार्थ भातकांडे यांनी आमदार राजू सेठ यांचा शाल, पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी इकबाल मुल्ला, ऐजाज इनामदार, रियाज मुजावर, अमजद मुजावर यांच्यासह रहिवाशी उपस्थित होते.