बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख व कर्नाटकचे आयजीपी संदीप पाटील यांनी थायलंड येथे आयोजित जगातील खडतर समजली ‘जाणारी ‘आयर्न मॅन’ शर्यत जिंकली आहे.
थायलंड येथे गेल्या रविवारी आयर्न मॅन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर शर्यतीमध्ये जगभरातील २००० हून अधिक स्पर्धकांनी – भाग घेतला होता. या शर्यतीचे स्वरुप १.९ कि. मी. जलतरण, ९० कि. मी. सायकलिंग आणि २१ कि. मी. धावणे असे होते. शर्यतीत ‘सहभागी स्पर्धकांसमोर हे तीन क्रीडा प्रकार विक्रमी वेळेत सलग पूर्ण “करण्याचे खडतर आव्हान होते.
सदर आव्हान यशस्वीरीत्या पेलत -आयजीपी संदीप पाटील यांनी थायलंड येथील आयर्न मॅन शर्यतीचे विजेतेपद हस्तगत केले. जागतिक स्तरावरील अतिशय खडतर समजली जाणारी ही स्पर्धा जिंकल्याबद्दल संदीप पाटील यांचे कौतुक होण्याबरोबरच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तंदुरुस्त आरोग्य आणि जिद्दीसह खडतर मेहनत घेण्याची तयारी असल्यास कोणतीही स्पर्धा जिंकणे अशक्य नसते.
हे सिद्ध करताना आयर्न मॅन सारखी अत्यंत खडतर शर्यत जिंकण्याद्वारे संदीप पाटील यांनी तंदुरुस्त आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संदीप पाटील हे २००४ बॅचचे कर्नाटक केडरचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगाव येथे जिल्हा पोलीस प्रमुखपद समर्थपणे सांभाळले आहे.