पत्नीसोबतचा खाजगी व्हिडीओ ठेवून तिला घटस्फोट देण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याची घटना बेळगाव शहरात घडली आहे.
बेळगाव येथील रहिवासी असलेल्या किरण पाटील यांना पत्नीपासून घटस्फोट हवा होता. महिलेने नकार दिल्यावर त्याने तिचा खासगी व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी तर दिलीच शिवाय तिचा मानसिक छळही केला.
याला कंटाळून महिला पोलिस ठाण्यात गेली. याप्रकरणी जिल्हा सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याची विनंती महिलेने केली. आरोपीला स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली असता त्याच्या मोबाईलवर पत्नीसोबतचा एक खाजगी व्हिडिओ असल्याचे समोर आले. यावेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच आरोपी फरार झाला.
फरार आरोपी किरण पाटील याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तो सध्या शहरातील हिंडलगा कारागृहात आहे.