कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाने सीमाभागातील दूध उत्पादकांच्या दूध खरेदी दरात कपात केल्याने दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघाच्या अलतगा येथील मिल्क कुलिंग सेंटर समोर आंदोलन छेडले.
गोकुळ दूध संघाने एक फेब्रुवारी पासून बेळगाव आणि सीमाभागातील दूध उत्पादकांच्या खरेदी दरात कपात केली आहे.म्हशीच्या दुधात दोन रुपये तर गायीच्या दुधात साडे चार रुपये प्रति लिटर कपात केली आहे.
बेळगाव आणि सीमाभागातील दूध उत्पादक गोकुळ दूध संघाला दररोज हजारो लिटर दूध पुरवठा करतात.काही दिवसापूर्वी दूध उत्पादकांना दूध वाढवण्यासाठी म्हशी,गायी खरेदी करून अधिक दुधाचा पुरवठा करा असे आवाहन गोकुळ दूध संघाने केले होते.त्याला अनुसरून अनेकांनी कर्ज काढून म्हैस,गाय खरेदी केली होती.असे असताना सध्या दुधाचे उत्पादन वाढल्याने सीमाभागातील दूध पुरवठा करणाऱ्यांच्या खरेदी दरात कपात केल्याचे गोकुळ दूध संघाने कळवले आहे.
त्यामुळे संतापलेल्या दूध उत्पादकांनी मिल्क कुलिंग सेंटर समोर आंदोलन करून दुधाचे दर पूर्ववत करण्याची मागणी केली.मिल्क कुलिंग सेंटरच्या व्यवस्थापकांनी दूध उत्पादकांची मागणी कार्यकारी संचालकांना कळविण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.