शेतकरी कर्जमाफीसाठी दुष्काळ पडूदे म्हणून वाट बघतात असे वादग्रस्त वक्तव्य केलेल्या साखर मंत्री शिवानंद पाटील यांचा निषेध करून यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून शेतकऱ्यांनी एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट समोर आंदोलन केले.
रयत संघ आणि हसिरू सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री शिवानंद पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन भंडारा उधळला.एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट मधील मंत्र्यांच्या नावाचा नामफलक काढावा आणि त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली.आक्रमक शेतकऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखले.यावेळी आंदोलक आणि पोलिसात शाब्दिक चकमक झडली.अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
अथणी येथील कार्यक्रमात साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी दुष्काळ पडूदे म्हणून वाट बघतात.कृष्णा नदीचे पाणी फुकट मिळते.वीज मोफत मिळते. खते, बियाणे सवलतीच्या दरात मिळतात.असे असताना कर्जमाफीसाठी शेतकरी दुष्काळाची वाट बघतात असे वक्तव्य केले होते.त्यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी निषेध करून राजीनाम्याची मागणी केली आहे तर शेतकऱ्यांच्या बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्या बद्दल शेतकरी संतप्त झाले आहेत.