बेळगावच्या अबकारी खात्याने गोवा बनावटीचे पंचवीस लाख रुपयांचे मद्य जप्त करून वाहन चालक आणि क्लिनरला अटक केली.
कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने मशरूमच्या बियांच्या पोत्यांच्या मध्ये मद्याचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते . मशरूम ची पोती बाजूला केल्यावर तेथे मद्याचे बॉक्स आढळले.
गोव्याहून मध्यप्रदेशाला सोळा चाकाच्या ट्रक मधून मोठ्या प्रमाणावर मद्य नेण्यात येणार असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे अबकारी खात्याने पाळत ठेऊन गुरुवारी मध्यरात्री काकती येथे संशयावरून ट्रक थांबवून तपासणी केली असता गोवा बनावटीचे उंची मद्याचे सहाशे बॉक्स आढळून आले.गेल्या अनेक दिवसापासून गोव्याहून मध्यप्रदेशला मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली होती.त्याच्या आधारावर पाळत ठेऊन अबकारी खात्याने ही कारवाई केली.गोवा बनावटीचे पंचवीस लाखाचे मद्य आणि मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला तीस लाखाचा ट्रक असा एकूण पंचावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.