साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी सोन्याची खरेदी करण्यासाठी लोकांनी सकाळ पासून सराफी दुकानात गर्दी केली होती.
दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दहा ग्रॅमला ६३३०० रुपये इतका होता तर चांदीचा एक किलोला भाव ७५००० रू इतका होता.सोन्याच्या दरात वाढ झालेली असली तरी लोकांचा सोने खरेदीचा उत्साह कायम होता.दसऱ्याच्या निमित्ताने लोकांनी मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा कायम राखली असल्याचे सराफी दुकानातील गर्दी पाहून समजले.दसऱ्याच्या दिवशी चोख सोन्याला अधिक मागणी होती.दसऱ्याच्या आदले दिवशी देखील अनेक ग्राहकांनी सोन्याची ऑर्डर सराफी पेढीत नोंदवली होती.
चोख सोन्याच्या बरोबरच चेन,बांगड्या, ब्रेसलेट,सोन्याचे वळे,विविध प्रकारचे नेकलेस,हार,अंगठ्या यांनाही मागणी होती.चांदीच्या वस्तूंची देखील अनेक ग्राहकांनी खरेदी केली. समई, ताट,फुलपात्र,हळदी कुंकवाचे करंडे,अत्तरदाणी,गुलाबदाणी,तांब्या आणि वेगवेगळ्या मूर्तींची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.सोन्याचा दर इस्राएल युद्धामुळे वाढलेला असला तरी मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा लोकांनी कायम राखली.सकाळी थोडी गर्दी कमी होती पण दुपार नंतर ग्राहकांची गर्दी वाढत गेली.त्यामुळे चोख सोन्याच्या विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पोतदार ज्युवेलर्सचे संचालक मिहिर पोतदार यांनी दिली.