खानापूर : राष्ट्रीय पक्षानी सातत्याने मराठी भाषिक आणि मराठा समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने कारवार लोकसभा निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे त्यामुळे शिवस्वराज्य जनकल्याण फाऊंडेशनतर्फे समितीच्या निर्णयाला जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात आला असून समितीने उमेदवार जाहीर करण्यास विलंब करू नये अशी मागणी करण्यात करण्यात आली आहे.
शिवस्वराज फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई होते. यावेळी बोलताना सरदेसाई यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय पक्ष मराठा समाज आणि मराठी भाषिकांचा फक्त मतांसाठी वापर करून घेत आहे. मात्र येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मराठी भाषिकांची ताकद निर्माण करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली असून लढ्याचा एक भाग म्हणून समितीने निवडणूक लढविल्या आहेत त्याच प्रमाणे कारवार लोकसभा मतदार संघातून यापूर्वी समितीशी संबंधित असलेल्या दिनकर देसाई व माजी आमदार बी पी कदम यांनी विजय मिळविलेला आहे तसेच खानापूर, हल्लाळ, सुपा, जोयडा, कारवार, यल्लापूर मतदार संघात मराठा समाज अधिक प्रमाणात आहे त्यामुळे सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळणार आहे त्यामुळे शिवस्वराज्य जनकल्याण फाऊंडेशनतर्फे समितीच्या निर्णयाला जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती दिली.
संघटनेचे पदाधिकारी रमेश धबाले, रणजीत पाटील, विनोद पाटील, सुनिल पाटील, मिलिंद देसाई आदिनी समितीची व्होट बँक कायम ठेवण्यासाठी समितीने उमेदवार द्यावा लोकसभा निवडणुकीत यश मिळाले तर तर पुढील जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना पाठबळ मिळेल असे मत व्यक्त केले. तसेच उमेदवार जाहीर करण्यास विलंब न करता मंगळवारी होणाऱ्या तालुका समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
बैठकीला संदेश कोडचवाडकर, सुधिर नावलकर, बाळासाहेब शेलार, मुकुंद पाटील, प्रभू कदम, अभिजित सरदेसाई, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.