वेगळ्या पद्धतीने सक्षम आणि वंचित मुलांसाठी आयोजित 22 व्या भव्य मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराची दरवर्षीप्रमाणे नुकतीच यशस्वीरित्या सांगता झाली.शहरातील स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा पार पडली.
गेल्या 12 दिवस आयोजीत शिबिरामध्ये दिव्यांग, दृष्टीहीन, बौद्धिक दृष्ट्या विकल, मूक-बधिर, आदिवासी तसेच विविध संस्था शाळांमधील वंचित मुले अशा जवळपास 200 मुलांना जलतरणाचे प्राथमिक धडे देण्यात आले. मोफत जलतरण प्रशिक्षणासह सहभागी सर्व मुलांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांना दररोज जलतरणाचे साहित्य आणि सकस आहार पुरवण्यात आला.
यावेळी शिबिरार्थींनी विविध प्रकारातील जलतरण कौशल्य सादर करून प्रमुख पाहुण्यांची वाहव्वा मिळविली. प्रमुख पाहुणे कर्नल अजित सिंग यांनी आपल्या भाषणात समाजातील दिव्यांग आणि वंचित मुलांच्या उत्थानासाठी संयोजकांकडून दरवर्षी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
शहरातील सुवर्ण जीएनएमसी जलतरण तलाव येथे गेल्या शनिवारी आयोजित शिबिराच्या सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या कमांडो विंगचे कमांडर कर्नल अजित सिंग, रोटरीचे माजी प्रांतपाल व एसकेई सोसायटीच्या स्पोर्ट्स अकॅडमीचे चेअरमन रो. आनंद सराफ, अलाईड फाउंडर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन राम मल्ल्या, एसएलके ग्रुप इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी एस. सलमा आणि स्विमर्स क्लबच्या अध्यक्षा लता कित्तूर उपस्थित होत्या.
सदर शिबिराच्या आयोजनासाठी केएलई सोसायटी, जयभारत फाउंडेशन, अलाईड फाउंडर्स प्रा. लि., एसएलके ग्रुप इंडिया, शिरीष गोगटे, पै ग्रुप ऑफ हॉटेल आदींचे मोठे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकल्प संचालक उमेश कलघटगी यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य मेंडके, नितीश कडूचकर, अक्षय शेरेगार, गोवर्धन काकतकर, शिवाजी मानमोडे, विनोद दोडमणी, विनायक आंबेवाडीकर, प्रवीण कणबरकर, समीर नदाफ, अजित जेन्टीकट्टी, चंद्रशेखर डी. एच. आदिंनी विशेष परिश्रम घेतले.