दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बेळगावच्या बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाली.सराफी पेढ्या,इलेक्ट्रॉनिक वस्तूंची शोरूम,दुचाकी ,कार यांच्या शोरुममध्ये सकाळपासून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.दिवाळी पाडव्याच्या दिवशी चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅम ला 62500 रू इतका होता.एक किलो चांदीचा दर 72400 रू इतका होता.चोख सोन्याबरोबर ग्राहकांनी तयार दागिन्यांची देखील खरेदी केली.
दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी अगोदरच सोने,दागिने,दुचाकी आणि कारचे बुकिंग केले होते.फ्रिज,टी व्ही,कॉम्प्युटर, लॅपटॉप ,मायक्रोवेव्ह ओव्हन आदी वस्तूंची देखील मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.यावर्षी बजाजच्या दुचाकी वाहनांना सर्वाधिक मागणी होती.दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अडीच हजार बजाज पल्सर दुचाकीची विक्री केल्याची माहिती जगजम्पी बजाज चे संचालक मल्लिकार्जुन जगजम्पी यांनी दिली.
मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी दुचाकी वाहनांना मागणी अधिक असून अनेक ग्राहकांना दिवाळी नंतर बजाज पल्सर देणार असल्याचे मल्लिकार्जुन जगजम्पी यांनी सांगितले.दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर टाटा नेक्सन ,टाटा पंच या कारची सर्वाधिक विक्री झाली.ग्राहकांनी दीड महिना अगोदर पासून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कार घेण्यासाठी बुकिंग केले असल्याची माहिती टाटा मोटर्स विक्रेत्यांनी दिली.