This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अमृत महोत्सवानिमित्त प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते सन्‍मान !*

*अमृत महोत्सवानिमित्त प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते सन्‍मान !*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वेदपरंपरेचे रक्षणकर्ते, विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्रीरामजन्‍मभूमी तीर्थ क्षेत्र न्‍यासाचे कोषाध्‍यक्ष प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा सन्‍मान करण्‍यात आला. ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे आयोजन करण्यात होते. या वेळी प.पू. स्वामीजींच्या ओघवत्या वाणीतील मार्गदर्शनाने उपस्थित राष्ट्र आणि धर्माभिमानी एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन बाहेर पडले !

या वेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्‍हणून राज्‍याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले, स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारकाचे कार्याध्‍यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ता श्री. रमेश शिंदे आणि सुदर्शन न्‍यूजचे मुख्‍य संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके हे मान्‍यवर उपस्‍थित होते. सुदर्शन न्‍यूजचे मुख्‍य संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी यांची प्रकट मुलाखत या वेळी घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

*प.पू. स्वामीजींचे तपस्वी जीवन रखरखत्या उन्हात वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे !* – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

प.पू. स्वामीजींसारख्या तपस्वींनी धर्मासाठी केलेले कार्य हे रखरखत्या उन्हात वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे आहे. या स्पर्धेच्या युगात संतांच्या मार्गदर्शनाचा सर्वांना आधार वाटतो. संतांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही जनतेची सेवा करू शकतो. स्वामीजींचे अखंडित कार्य आणि मार्गदर्शन यांमुळे समाजाला लाभ होत आहे. प.पू. स्वामीजींनी ७५ वर्षे अखंड यज्ञकुंड पेटवला आहे. स्वत:साठी सर्व जगतात; परंतु स्वामीजींसारखी व्यक्तीमत्त्वे देशासाठी कार्य करतात, हे आपले भाग्य आहे. आपली प्राचीन संस्कृती, मंदिरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड-दुर्ग यांचे रक्षण करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे, असे भावोद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी काढले.

*छत्रपती शिवराय, संत ज्ञानेश्वर यांचा आदर्श घेतला, तर महाराष्ट्र जगाचे नेतृत्व करेल !* – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

माझ्या विचारांची गंगा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद या दोन तटांमधून वहात गेली म्हणून ती श्रीराम मंदिरापर्यंत पोचू शकली. छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर यांची विचारधारा देशाला तारणारी आहे. अनेक पिढ्यांनंतर श्रीराम मंदिर उभे राहिले. आता मात्र याच पिढीत आपले राष्ट्र उभे रहात असतांना आपण अनुभवूया. मी जगाच्या सर्व वाङ्मयाचा मागोवा घेतला; पण जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखी रत्ने नाहीत. महाराष्ट्र जर यांचा आदर्श घेऊन चालेल, तर महाराष्ट्र पुन्हा एकदा जगाचे नेतृत्व करेल, असे उद्गार प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी काढले.

*स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे अध्यात्म समष्टीसाठी आहे* – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

अध्यात्माचे प्रमुख ध्येय हे मोक्ष असते; पण स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे अध्यात्म हे समष्टीसाठी आहे. स्वामीजी तुम्ही संन्यास घेतला तरी राष्ट्र कार्यही केले आहे. राष्ट्रासाठी तुम्ही सर्वात मोठे केलेले कार्य म्हणजे श्रीराम मंदिर; कारण राम आमच्या राष्ट्राचा प्राण आहे. वीर सावरकर म्हणाले होते, जेव्हा आपण रामाला विसरू, तेव्हा आपल्या देशाचा प्राण जाईल. रामजन्मभूमीची घोषणा झाली तेव्हा स्वामीजी तुमच्यावर कोषाध्यक्षाची जबाबदारी आली. ही जबाबदारी आपण अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि अत्यंत समयबद्ध पद्धतीने करत तुम्ही हे राम मंदिर उभे केले आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी केले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज हे राष्ट्रयोगी संत आहेत. धर्म आणि अध्यात्म यांसह राष्ट्रविषयक महत्त्वाचे विचारधन स्वामीजी देत आहेत. भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ते पितृतुल्य स्थानी आहेत. आदर्श राज्याच्या म्हणजे रामललासाठी स्वामीजीच्या माध्यमातून कोषाध्यक्षही ‘आदर्श’ मिळाले आहेत. स्वामीजींच्या जीवनाचा आदर्श घेऊन धर्म आणि मंदिर रक्षणासाठी हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी हिंदूंनी पुढे यावे’.

‘कोरोनाच्या काळात गीतेवर, अध्यात्मावर शेकडो प्रवचने ऑनलाईन घेऊन स्वामीजींनी १०० हून अधिक देशांतील लोकांना धीर दिला. आशीर्वाद दिला. हे त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. सर्व धार्मिक विचार समजून घेऊन त्यातून अनुभूती देण्याचे आपण कार्य स्वामीजी करत आहेत, असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काढले. शिवसेनेचे खासदार श्री. राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्‍यक्ष आमदार श्री. आशिष शेलार, भाजपचे प्रवक्‍ते तथा आमदार श्री. अतुल भातखळकर यांनीही आपले विचार व्यक्त करून प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

राष्ट्रगीत आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत यांनी कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘सकल जगामध्ये छान, आमचे प्रियकर हिंदुस्तान…’ हे गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले, तसेच संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी अग्नी फाउंडेशनचे संकेतस्थळ, लोगो आणि ऍपचे अनावरण करण्यात आले. ‘वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली. या अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍याला विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांसह मोठ्या संख्यने हिंदू बांधव उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24