बेळगाव, प्रतिनिधी:
येळ्ळूर येथील सायकलपट्टू आनंद बाळकृष्ण धामणेकर हा येत्या 9 सप्टेंबर रोजी येळ्ळूर येथून चारधाम सायकल यात्रा करणार आहे. त्याच्या या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश युवकांमध्ये जागृती करणे असा आहे. त्याच्या या सायकल यात्रेसाठी आर्थिक मदत म्हणून येथील विजेता स्पोर्ट्सचे मालक निवृत्त कॅप्टन चंद्रकांत रामा कडोलकर यांनी त्याला आर्थिक मदत केली. त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्याला प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद म्हणाला, आजची युवा पिढी सोशल मीडियामध्ये जास्त गुंतल्याची दिसत आहे. मी आजच्या युवा पिढीला असा संदेश देऊ इच्छितो की या युवकांनी सोशल मीडियापासून शक्यतो दूर राहावे. सायकल चालवून आपले आरोग्य जतन करावे. त्याचबरोबर खेळामध्ये देखील यश मिळवावे. 9 रोजी तो सकाळी सहा वाजता येलूर येथून आपल्या या सायकल यात्रेला प्रारंभ करणार आहे. सुमारे 50 दिवस असा हा त्याचा सायकल प्रवास आहे. या यात्रेदरम्यान तो सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
आनंद धामणेकर याला मदत देतेवेळी निवृत्त आर्मी कॅप्टन चंद्रकांत रामा कडोलकर, आयुष बाचीकर ,जोतिबा पाटील , नितीश कडोलकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आर्थिक मदत केल्याबद्दल आनंद धामणेकर यांनी विजेता स्पोर्ट्सचे आणि इतरांचे आभार व्यक्त केले.