बेळगाव:श्रावण महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी सुक्षेत्र सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडला. सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन ओटी भरून देवीची कृपा प्राप्त केली.श्रावण महिन्यातील अमावस्येच्या निमित्ताने मंदिर फुलांनी आकर्षक व खास फुलांनी सजवण्यात आले.
देवीच्या पूजेसाठी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण दिवस भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले.भाविकांची संख्या वाढल्याने विशेष दर्शन व मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
श्री महालक्ष्मी देवीचा पालखी उत्सव मंगळवारी शेवटच्या दिवशी पार पडला.मंदिरात पालखीची प्रदक्षिणा करण्यात आली.यावेळी श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समिती,पुजारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच झांज पथक,ढोल ताशा,गावातील भजन यासह विविध वाद्यसंगीतांनी देवीचा पालखी उत्सव करण्यात आला. दुपारच्या सुमारास मुसळधार पावसातही देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावून देवीचे दर्शन घेतले. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.