बेळगाव , प्रतिनिधी:
येथील न्यायालयातील वकील आणि नागरिकांना एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात जाण्यासाठी भुयारी मार्गाची उभारणी करण्यात आली होती. या भुयारी मार्गामध्ये सध्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिले आहे. त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरून डासांची पैदास झाली आहे. याची दखल घेऊन या भुयारी मार्गातील पाणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रस्त्यावर सोडण्यात आले होते.
या पाण्यामधून दुचाकी वाहने जात असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
मोठ्या प्रमाणात खर्च करून उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचा दुरुपयोग होत आहे . त्यामुळे त्याची देखभाल करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या हा भुयारी मार्ग पाण्याने तुंबला असल्यामुळे तो कुचकामी ठरला आहे. त्यामुळे या भुयारी मार्गावर करण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे , असे नागरिकांतून बोलले जात आहे.