१९०४ साली सहकारी कायद्यावर आधारित पहिली सोसायटी ही बेळगाव जिल्ह्यातील बेल्लद बागेवा डी येथे सुरू झाली.खेड्यापाड्यातील लोकांनी एकत्र येऊन या सोसायटीची स्थापना केली.सामान्य माणसाला संघटित करून त्यांच्यात बदल सहकारी चळवळीने केला.सहकार महर्षी अर्जुनराव घोरपडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकात आणून सहकार,शिक्षण आणि अन्य क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.त्या काळात समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होत्या.त्यात शामराव देसाई आणि भुजंगराव दळवी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.अर्जुनराव घोरपडे यांचे सहकार आणि अन्य क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे असे उदगार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले.
सहकार महर्षी कै.अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्म शताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत होते.
सहकाराचा आधार घेऊन सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात बदल कसा करता येईल याचा विचार घोरपडे करायचे.फक्त शेती करून चालणार नाही.छोटे मोठे उद्योग करा म्हणून जनतेला प्रोत्साहन देत असत. सहकारा शिवाय पर्याय नाही.पूर्वीच्या महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात आणि केरळ राज्यात सहकाराची चळवळ फोफावली.
त्यामुळे त्या भागातील सर्वसामान्य जनतेला त्याचा उपयोग झाला आणि त्यांचे जीवनमान उंचावले असेही शरद पवार म्हणाले.शरद पवार यांचा बाळाराम पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मराठा मंदिर येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कै.अर्जुनराव घोरपडे जन्म शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर महाराष्ट्राचे निवृत्त पणन आयुक्त दिनेश ओऊळकर ,जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील,मराठा बँक चेअरमन दिगंबर पाटील,मराठा मंदिर अध्यक्ष अप्पासाहेब गुरव,जिजामाता बँकेच्या चेअर पर्सन भाविकारांणी होनगेकर आदी उपस्थित होते.नूतनीकरण करण्यात आलेल्या मराठा मंदिर सभागृहाचे उदघाटन आणि स्मरणिका प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शरद पवार यांचे सभागृहात आगमन होताच बेळगाव,कारवार ,निपाणी, बिदर,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आनंद मेणसे यांनी केले.