बेळगाव, ता. २१ तिघा दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सव्वा लाखाच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सुरेश रामप्पा इंनचल ऊर्फ इंचल (वय १९, रा. सुणकुंपी, ता. बैलहोंगल) आणि हणमंत लकाप्पा वंटी (वय ३०, रा. ममदापूर, ता. गोकाक ) असे संशयिताचे नाव असून, तिसरा संशयित हा अल्पवयीन आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बी. के. बाळेकुंद्री येथील यात्रेत ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजण्याच्यादरम्यान अज्ञातांनी दुचाकी लांबविली. याप्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात ३० हजार रुपयांची दुचाकी चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याची चौकशी करून पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यात दोघांसह एका अल्पवयीनला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीन दुचाकी (केए ४९, के. १६९५, केए २४, एल – ०३१४) आणि एक विनानंबरप्लेट वाहनाचा समावेश आहे. विनानंबर प्लेटचे वाहन निळ्या रंगाचे आहे.
चारही वाहनांची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार एक लाख १० हजार रुपये आहे.संशयित आरोपींनी दुचाकींची चोरी माळमारुती, मुरगोडसह अन्य भागात केली, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, एसीपी एस. व्ही. गिरीश, पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक, चंद्रशेखर सी. आदींसह बी. एन. बळगण्णावर, बी. बी. कड्डी, एच. एल. यरगुद्री, ए. एम. जमखंडी, एम. आर. सुळधाळ आदींनी कारवाईत भाग घेतला होता.