बेळगाव :
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने जलव्यवस्थापनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कृष्णा नदीतून 2 टीएमसी पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे 20 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात महाराष्ट्रातून कृष्णा नदीसाठी मिळणारा अतिरिक्त पाण्याचा प्रवाह बंद आहे. यंदा ही मदत पुन्हा मिळण्याची शक्यता असून, यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाला मोठा आधार मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मिळणारे पाणी केवळ नागरिकांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरले जाईल. कृषी सिंचनासाठी या पाण्याचा वापर केला जाणार नाही.
हिप्परगी बॅरेजमुळे पाणीसाठ्यावर परिणाम
हिप्परगी बॅरेजमधील गेट तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून महाराष्ट्राकडून पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बेळगावला पिण्याच्या पाण्याची चिंता नाही
सध्या जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोतांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. घटप्रभा नदीवरील राजा लखमगौडा जलाशयात सुमारे 5.5 टीएमसी पाणी असून, त्याचा वापर फक्त पिण्यासाठी केला जाणार आहे.
मलप्रभा नदी परिसरातही उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, बेळगावसह संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठ्याची स्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरासाठी आपत्कालीन पाणी आराखडा तयार
बेळगाव शहरात भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन ‘आपत्कालीन पाणी व्यवस्थापन योजना’ तयार करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.
खासगी बोअरवेल आणि टँकरची माहिती संकलित करून गरज पडल्यास त्यांचा वापर करण्याची तयारी सुरू आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे पावसावर संकट
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
अशा परिस्थितीत प्रशासनाकडून सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल. पिकांचे नुकसान झाल्यास नियमांनुसार मदत व दुष्काळी उपाययोजनांचा विचार केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन
सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कठीण काळात प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
