बेळगाव :
मन्नूर गावातील एका जमिनीच्या वापराबाबत ग्रामस्थांनी आक्षेप घेत प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. गावातील एका एकर जमिनीवर ‘मारिया कृपा सोसायटी’च्या नावाने फलक लावण्यात आल्याचा दावा करत ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवला.
या प्रकरणी मन्नूर येथील देवसकी पंच कमिटीच्या वतीने बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर ग्रामस्थांनी तलाठी महेंद्र पत्तार आणि आंबेवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी चिदानंद जंबगी यांना निवेदन दिले.
गावातील संबंधित जमिनीबाबत कोणतीही माहिती किंवा प्रक्रिया पारदर्शकपणे झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या निर्णयाबाबत आपला विरोध असल्याचे निवेदनातून स्पष्ट केले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मन्नूर गावातील पारंपरिक सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन या विषयावर प्रशासनाने योग्य चौकशी करावी आणि ग्रामस्थांच्या हरकतींचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करताना देवसकी पंच कमिटीचे चेअरमन मुकुंद भावकू तरळे यांच्यासह विनय कदम, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, रवी चौगुले, अरुण सांबरेकर, संदीप डोणकरी, संतोष केंचन्नावर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकरणाकडे आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
