बेळगाव : भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने गुरुवारी बेळगाव शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बाईक रॅली, भजन-कीर्तन आणि पारंपरिक खेळांनी सजलेल्या या मिरवणुकीत विश्वकर्मा समाजातील महिला, पुरुष आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
उद्यमबाग येथील विश्वकर्मा सेवा संघाच्या कार्यालयासमोर कार्यक्रमाची सुरुवात झाली. दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर बाईक रॅली व मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
मिरवणूक धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात पोहोचल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके, विश्वकर्मा समाजाच्या नेत्या अर्चना मैत्री, सीए सोमशेखर सुतार, उद्योगपती रवींद्र सुतार आणि विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर यांच्या हस्ते हा पूजन सोहळा पार पडला.
मिरवणुकीदरम्यान समाजबांधवांनी भजन-कीर्तन सादर केले. भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक झिम्मा-फुगडी खेळत उत्साह वाढविला. बाईक रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या कार्यक्रमास रमेश सुतार, वैजनाथ लोहार, गीता सुतार, नामदेव लोहार, दिनेश सुतार, किरण सुतार, प्रशांत बेळगावकर, प्रकाश कम्मार, गोपाळ लोहार यांच्यासह विश्वकर्मा सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धेसोबतच समाजाची एकजूट आणि पारंपरिक सांस्कृतिक वारसा या मिरवणुकीतून अधोरेखित झाला.









