बेळगाव | 17 सप्टेंबर 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त बेळगाव शहर, उत्तर-दक्षिण विधानसभा मतदारसंघ तसेच ग्रामीण भागात विविध सामाजिक, धार्मिक आणि जनसेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजप नेते व सामाजिक कार्यकर्ते किरण मारुती जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम पार पडले.
नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बेळगावातील कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक सुविधा, धार्मिक कार्यक्रम, रुग्णांची विचारपूस, फळे व साहित्य वाटप, दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांशी संवाद आणि गोमाता पूजन यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात चन्नम्मा सर्कलजवळील डीसी कंपाऊंड परिसरातील बसस्थानकाच्या उद्घाटनाने झाली. माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळावी, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
यानंतर चन्नम्मा सर्कल येथील गणपती मंदिरात मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले. खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते गणपती पूजन व आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
सेवा उपक्रमाचा भाग म्हणून बेळगाव जिल्हा रुग्णालय, बीम्स आणि सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटलमधील विविध विभागांना भेट देण्यात आली.
रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. रुग्णांना फळे आणि आवश्यक किटचे वाटप करण्यात आले. रुग्णालयातील सुविधा आणि उपचारासंदर्भातील अडचणींबाबतही माहिती घेण्यात आली.
बेळगावातील दिव्यांग, विशेष आणि गतिमंद विद्यार्थ्यांच्या संस्थांनाही भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाच्या गरजा, दैनंदिन अडचणी आणि उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना फळे, किट तसेच आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात बेळगाव शहरासह उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या सहभागातून गोमाता पूजन करण्यात आले.
गायींना हार घालून, हळद-कुंकू लावून पूजा व आरती करण्यात आली. नैवेद्य, फळे आणि फराळ अर्पण करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनीही गोपूजनात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ, जुने, सक्रिय तसेच महिला कार्यकर्ते उपस्थित होते. विविध भागांतील कार्यकर्त्यांना एकत्र आणून सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
“प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असून सर्वांना सोबत घेऊन सामाजिक उपक्रम पुढे नेण्याची गरज आहे,” अशी भूमिका किरण जाधव यांनी मांडल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्थितीचा भेद न करता समाजातील विविध घटकांपर्यंत सामाजिक उपक्रम पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
खासदार जगदीश शेट्टर, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, भाजप महानगर अध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार अनिल बेनके, भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक कदम, विनय कदम, सक्रिय कार्यकर्ते मनोज मल्हारी राजापूरकर, माजी खासदार मंगला अंगडी, महानगरपालिका गटनेते व नगरसेवक संतोष पेडणेकर, गजेश नंदगडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेळगावात सेवा उपक्रमांची मालिका सुरू करण्यात आल्याची माहिती स्थानिक पातळीवर देण्यात आली असून, पुढील काळातही विविध कार्यक्रम राबवण्याचे आयोजकांनी सांगितले आहे.









