संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रख्यात संवादिनी (हार्मोनियम) वादक सुधांशु कुलकर्णी यांना 'गुरु गौरव पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. बेंगळुरू येथे सतीश हंपीहोळी म्युझिक फाउंडेशन ट्रस्ट आयोजित 'ताल यात्रा' या संगीत आणि नृत्याच्या संगम कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पंडित बसवराज बेंडिगेरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा हा पुरस्कार संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून सुधांशु कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नाटक कलाश्री मृत्युंजय शेट्टर यांनी आपल्या मनोगतात कला क्षेत्राच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. गायन, वादन आणि नृत्य या सर्व कलाप्रकारांचा भेद न करता जागतिक स्तरावर भारतीय कलांचा प्रसार आणि विकास व्हावा, यासाठी सतीश हंपीहोळी यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यास शिक्षणतज्ज्ञ व्होडे पी. कृष्णा, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र भट, ट्रस्टचे अध्यक्ष सतीश हंपीहोळी, उद्योगपती शैलेंद्र शर्मा, मृदंगवादक आनूर अनंतकृष्ण शर्मा, साहित्यिक आशुतोष शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
