बेळगाव तालुक्यातील सुतगट्टी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या नियोजनबद्ध मोहिमेत सुरक्षितपणे पिंजऱ्यात पकडण्यात आला. या कारवाईनंतर सुतगट्टीसह आसपासच्या गावांतील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून, वन विभागाच्या पथकाचे कौतुक केले आहे.
सुतगट्टी गाव काकती वनक्षेत्रालगत असल्याने बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत होता. विशेषतः पहाटे आणि सायंकाळच्या वेळेत शेतमळे, गावाबाहेरील रस्ते आणि शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी, दुचाकीस्वार तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींवरही परिणाम झाला होता.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या हालचालींचे व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले. या घटनेची गंभीर दखल घेत वन विभागाने तातडीने विशेष मोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या पावलांचे ठसे आणि हालचालींचा अभ्यास करून त्याच्या वावराच्या परिसरात रणनीतीपूर्वक पिंजरा उभारला.
अनेक दिवसांच्या सतर्कतेनंतर बुधवारी ही मोहीम यशस्वी ठरली आणि बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात अडकला. कोणतीही अनुचित घटना न घडता वन विभागाने ही कारवाई पूर्ण केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही घटना काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
