बेळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चिरडल्या 48 हून अधिक मेंढ्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात शनिवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. जालिक्कोप्पा गावाजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने 48 हून अधिक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 पेक्षा अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या.
प्राथमिक माहितीनुसार, कार बैलहोंगलहून बेलवडीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट कळपात घुसले. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की अनेक मेंढ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत झालेल्या मेंढ्या केंगानूर येथील चंद्रप्पा हित्तलमनी आणि दोडवाड येथील बीरप्पा यांच्या मालकीच्या असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात काही गर्भवती मेंढ्यांचाही मृत्यू झाल्याने घटनास्थळी अत्यंत वेदनादायी दृश्य निर्माण झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
