अलीकडेच निधन झालेल्या प्रसिद्ध पार्श्वगायिका एस. जानकी यांच्या स्मरणार्थ स्पंदना मेलोडीजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वर श्रद्धांजली कार्यक्रमाने जानकी यांच्या चाहत्यांसह संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले.
राणी चन्नम्मा नगर येथील ऑर्किड्स अपार्टमेंटमध्ये रंगसृष्टीच्या सहकार्याने गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खचाखच भरलेल्या सभागृहातील रसिकांनी सुमारे अडीच तास जानकी यांच्या गाजलेल्या गीतांचा मनमुराद आनंद घेतला.
बेळगावच्या ‘बेळ्ळी चुक्की’ संघटनेच्या संस्थापिका राजेश्वरी हिरेमठ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी रंगसृष्टीचे अध्यक्ष रमेश जंगल, उपाध्यक्ष एम. के. हेगडे व शैलजा भिंगे, सचिव शरणगौडा पाटील, स्पंदना मेलोडीजच्या संस्थापिका तसेच रंगसृष्टीच्या कोषाध्यक्षा शांता आचार्य, प्रसिद्ध संगीत शिक्षक एम. जी. राव, रंगकर्मी रवी आचार्य आदी उपस्थित होते.
दीपा पडकी यांनी गायलेल्या ‘पूजिसलेंदे हूगळ तंदे’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुकल्प मठपती आणि श्रुती कामत यांनी ‘जीव वीणे’, तर शांता आचार्य आणि महेश कुलकर्णी यांनी ‘ओंदे ओंदे आसೆಯु’ आणि ‘मातोंदु हेलुवे’ ही गीते सादर केली.
भुजंग पाटील आणि कविता जाधव यांनी ‘दिल में हो तुम’ व ‘यार बिना’, श्रुती कामत यांनी ‘भानल्लू नीने भुवियल्लू नीने’, तर भुजंग पाटील आणि दीपा पडकी यांनी ‘ई संभाषणे’ हे गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली.
सावित्रीअम्मा यांनी ‘देवर आट बल्लवरारू’, महेश कुलकर्णी आणि श्रुती कामत यांनी ‘नीनेल्लो नानल्ले’, तर महेश कुलकर्णी आणि दीपा पडकी यांनी ‘नगुवा नयन’ ही गीते सुरेलपणे सादर केली. मराठी भाषिक कलाकारांनीही कन्नड गीते अत्यंत सुंदरपणे सादर करून रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व कलाकार व रसिकांनी एकत्रितपणे केलेल्या जॅमिंग सत्राने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
पूर्णा हेगडे यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ साहित्यिक व रंगदिग्दर्शक शिरीष जोशी यांनी स्वागत करून एस. जानकी यांच्या जीवनप्रवासाचा परिचय करून देत कार्यक्रमाचे मनोज्ञ निवेदन केले. उषा बाळिगा यांनी स्पंदना मेलोडीज तसेच सहभागी कलाकारांचा परिचय करून दिला.
प्रभुनगर येथील बालकलावंत सावित्रीअम्मा यांनी सादर केलेल्या ‘देवर आट’ या गीताला रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांची दाद दिली. सावित्रीअम्मा यांचा परिचय शुभा हेगडे यांनी करून दिला. शांता आचार्य यांनी आभार मानले.
