बेळगाव : ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, याचे उदाहरण कडोली गावची कन्या स्वाती पाटील हिने घालून दिले आहे. म्हैसूर येथे आयोजित म्हैसूर दसरा महोत्सव-२०२६ अंतर्गत कुस्ती उपसमितीच्या वतीने झालेल्या कुस्ती स्पर्धेत स्वातीने द्वितीय स्थान मिळवत ‘म्हैसूर दसरा किशोरी पुरस्कार’ पटकावला.
या स्पर्धेचे आयोजन कुस्ती उपसमितीच्या माध्यमातून युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग आणि कर्नाटक कुस्ती संघ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. म्हैसूर येथील दसरा महोत्सवाच्या क्रीडा कार्यक्रमात स्वातीने केलेली कामगिरी तिच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि कुस्तीप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक मानली जात आहे.
स्वाती पाटील हिच्या या यशाची दखल घेत युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले की, ग्रामीण भागातून अधिकाधिक दर्जेदार खेळाडू घडणे आवश्यक आहे. त्यासाठी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या स्तरावर संधी मिळावी आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात, असे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आणि युवतींमध्ये प्रचंड क्रीडा गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास जिल्ह्यातून अनेक प्रतिभावान खेळाडू निर्माण होऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या सत्कारप्रसंगी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य राजू मायानाचे उपस्थित होते.
स्वाती पाटील हिच्या या यशामुळे कडोली गावाचा गौरव वाढला असून तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

